Sunday, March 22, 2020

कोरोना - दोष कुणाचा ?

           हल्ली काही दिवसांपासून जगात सर्वांच्या मनात धास्ती भरणारा हा कोरोना विषाणू कुठून आलाय? या विषाणूच्या जगभर होत असलेल्या लागणीला दोषी कोण? चीन ? औषधशास्त्र ? की जगभरातल्या प्रशासन यंत्रणा? जागतिक व्यापार युद्ध? सगळ्या जगाला वेठीस धरणारा हा कोविड १९ आजार नेमका कसा आला?
         
           शास्त्रज्ञांच्या मते कोरोना विषाणू हा नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण झालेला विषाणू आहे. २००३ मध्ये सार्क आढळून आला आणि  काही वर्षांनी मर्क आजार आखाती देशामध्ये आढळून आला. हे पण कोरोना सारख्या विषाणुंचेच प्रकार होते, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. डिसेंबर २०१९ मध्ये चीनच्या वुहान शहरामध्ये प्रथम या विषाणूची नोंद केली गेली.  आणि चीन मध्ये फेब्रुवारी च्या मध्य पर्यंत बरीच जीवित हानी झाली. दरम्यानच्या काळात, हा विषाणू जगात काही देशांत आपले पाय पसरवून बसला होता.

           चीन मध्ये जानेवारी च्या मध्यान्न नंतर सुटीचा हंगाम असतो आणि या दरम्यान वुहान वरून बरेच लोक चीन च्या विविध भागात पसरले. १.१ कोटी लोकसंख्या असलेले वुहान शहर आपल्या मुंबई सारखेच लोकसंख्येने गजबजलेले. परंतु या काळात हा विषाणू कसा पसरतो याबद्दल अनभिज्ञता होती.
सुरुवातीला चीन बरोबर दक्षिण कोरिया, जपान व थायलंड हे देश कोरोनाच्या विळख्यात सापडले. त्यापाठोपाठ अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यातील सिएटल शहरात एक ३० वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. हा युवक वुहान शहरातून परतला होता.

            नंतर चीन सरकारणेसुद्धा प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून वुहान शहर पूर्णपणे बंद केले. जरी एवढी मोठी लोकसंख्या असलेले वुहान शहर बंद केले पण याचवेळी कोरोना विषाणू आता इटली आणि पाठोपाठ युरोप खंडाच्या विविध देशांमध्ये पसरू लागला होता. यूरोप नंतर अमेरिका आणि इराण मध्ये कोरोना चा प्रादुर्भाव गंभीर रित्या वाढला. अमेरिकेनेतर कोरोना रोकण्या साठी ५० अब्ज अमेरिकी डॉलर्स मदतीसाठी घोषित केले.

          याचपाठोपाठ भारतातही राजस्थान, केरळ, दिल्ली, महाराष्ट्र व इतर राज्यांमध्ये कोरोना चा प्रवेश झाला. प्रामुख्याने यात विदेशातून आलेले लोक होते. या दरम्यान कोरोना विषाणू वर बऱ्यापैकी संशोषण झाले होते. आणि या विषाणूची लागण कशी होते, कशाच्या मार्फत पसरतो आणि कशाच्या नाही याची माहिती शास्त्रज्ञांकडून उपलब्ध झाली. यावर इलाज नसला तरी खबरदारी व प्रतिबंधात्मक उपाय माहित झाल्याने, जागतिक आरोग्य संघटनेच्या दिशादर्शकानुसार भारताच्या केंद्र व राज्य सरकारने विविध उपाययोजना सुरु केल्या.
           विविध कोरोना बाधित देशांतील भारतीयांना स्वदेशी आणण्यात आले व त्यांवर उपचार करण्यात आले.
सध्या सर्व विदेशी विमानाचे आगमन रद्द केल्याने बराच दिलासा मिळेल. सोबतच विषाणू चा देशात सर्वत्र उद्रेक होऊ नये म्हणून काही राज्यांनी बंद केलेली रेल्वे व हवाई वाहतूक नक्कीच मदत करेल. सर्व जनता सुद्धा शासनाच्या उपाययोजनांत साथ देते आहे. जशी बाधितांची संख्या इटली व इराण मध्ये वाढली, तशी भारतात वाढू नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना ! कोरोना बरोबरची लढाई भारताबरोबर जगही जिंकेल आणि कोरोना मुळे अस्थव्यस्थ झालेली अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येईल हीच आशा करूया !

जय हिंद ! जय भारत !